पुणे : शहरातील गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नाना पेठ परिसरात झालेल्या आयुष कोमकरच्या हत्येप्रकरणी (Pune Crime) मोठी उपडेट समोर आली आहे. या हत्येतील फरार आरोपी मुनाफ पठाणला गुन्हे शाखेने अटक केली आहे. पठाणनेच या गुन्ह्यासाठी पिस्तूल पुरवल्याचा आरोप आहे, ज्यामुळे त्याचा या हत्याकांडातील सहभाग स्पष्ट झाला आहे.

नेमकं काय घडलं?
आयुष कोमकरच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल मुनाफ पठाणने पुरवले होते, अशी माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. मुनाफ पठाण हा कुख्यात गुंड आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंदेकरचा जवळचा साथीदार असल्याची माहितीही समोर आली आहे.
या हत्येमागे वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्याचा कट असल्याचा संशय असून, त्या कटातही मुनाफ पठाणचा सहभाग असल्याचं पोलिसांना वाटत आहे. दरम्यान, या प्रकरणात तपास सुरू असतानाच वनराज आंदेकरचा भाऊ कृष्णा आंदेकर पोलिसांसमोर शरण आला होता.
पोलिस तपास
या हत्या प्रकरणात पोलिसांनी आंदेकर कुटुंबातील महिलांचीही चौकशी सुरू केली आहे. वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर आणि कृष्णा आंदेकरची पत्नी प्रियंका आंदेकर यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. समर्थ पोलिसांनी त्यांना बोलावून घेतले असून, गुन्हे शाखेमार्फत त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
दरम्यान, यापूर्वी वनराज आंदेकर यांचे बंडू आंदेकरसह १२ आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते, तेव्हा बंडू आंदेकर यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. पोलिसांनी आपल्याला “कृष्णा आंदेकरची माहिती दे, नाहीतर गोळ्या झाडू”, अशी धमकी दिल्याचे बंडू आंदेकर यांनी न्यायालयाला सांगितले होते. मात्र, तपास अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले. हा प्रकार समजल्यानंतर कृष्णा आंदेकर स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, लवकरच पुढील कारवाई केली जाईल.







