पुणे : पुण्यात वाढती गुन्हेगारी एक मोठी समस्या बनली आहे. अशातच एनडीए रस्त्यावरील शिवणे परिसरात तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. वैमनस्यातून टोळक्याकडून हा खून करण्यात आला आहे. दिनेश विश्वकर्मा (वय २४, रा. शिवणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी राज अनिल ठाकूर (वय १९), ॲलेक्स अरुण अँथोनी (वय २४) , निखील ठाकूर (वय २२), प्रकाश प्रेमबुडा (वय २०), साहिल राजेंद्र वाघमारे (वय २१, सर्व रा. उत्तमनगर, एनडीए रस्ता) यांना अटक करण्यात आली. याबाबत विनाेद थापा (वय २३, रा. उत्तमनगर) याने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश प्रेमबुडा आणि दिनेश विश्वकर्मा मूळचे नेपाळचे आहेत. दोघांचे कुटुंबीय उत्तमनगर परिसरात राहत आहे. दीड महिन्यापूर्वी दोघांमध्ये भांडण झाले होते. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास शिवणे परिसरातून निघालेल्या विश्वकर्माला आरोपी प्रेमबुडा आणि साथीदारांनी गाठून त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
गंभीर जखमी अवस्थेतील विश्वकर्माला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी दुपारी विश्वकर्माचा उपचारांदरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू झाला, अशी माहिती उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यानी दिली आहे. फरार झालेल्या पाच आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खंदारे करत आहेत.