प्रतिनिधी, अमित मुंडीक
Pune Crime : दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत सराईत आरोपीस जेरबंद केले असून, त्याच्याकडून तब्बल १८ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व अॅक्टिव्हा स्कूटर हस्तगत करण्यात आली आहे.
दिनांक ०७ जानेवारी २०२६ रोजी येरवडा परिसरातील शंकरराव जाधवनगर येथे एस.जी. सुपरमार्केट व लेडीज टेलरच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या अनोळखी इसमाने शिलाई मशीनजवळ पिशवीत ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून पोबारा केला होता. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ०७/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Pune Crime)

या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अंमलदार राहुल इंगळे व प्रफुल्ल मोरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक संशयित इसम हडपसर माळवाडी येथील सिरम कंपनीजवळ जुन्या कॅनलवरील पुलाजवळ सोन्याची विक्री करण्याच्या उद्देशाने स्कूटरसह थांबलेला आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचून जयेश चंद्रशेखर खिच्ची (वय ३९, रा. मांजरी खुर्द, पुणे) यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता १३८ ग्रॅम १९० मिली वजनाचे सोन्याचे दागिने (मोठे व लहान मंगळसूत्र, कानातील झुमके व अंगठी) तसेच अॅक्टिव्हा स्कूटर असा एकूण १८,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून पुणे व रायगड जिल्ह्यात त्याच्यावर यापूर्वीही घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे व सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या सूचनेनुसार दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ ने यशस्वीरीत्या केली आहे.






