पुणे : मूळ छत्रपती संभाजीनगरची असलेली आणि शिक्षणासाठी लंडनला गेलेली मुग्धा देशमुख हिचा मृतदेह पिंपरी-चिंचवडमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या मृत्यू प्रकरणाची चर्चा सुरू असून, मुग्धाचा मृत्यू नेमका कसा झाला, ती लंडनहून पुण्यात कशी आली आणि तिच्या मृत्यूमागे काही घातपात आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून शवविच्छेदनादरम्यान मुग्धाचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मुग्धाचा मृत्यू नेमका कधी झाला आणि त्यामागचे कारण काय आहे, हे स्पष्ट करण्यासाठी व्हिसेरा पुढील तपासणीसाठी राखून ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदन करताना मृत्यूचे निश्चित कारण स्पष्ट होत नसल्यास किंवा मृत्यू संशयास्पद वाटल्यास व्हिसेरा जतन केला जातो. त्यामुळे ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या अहवालाकडे आणि पुढील फॉरेन्सिक तपासणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या माहितीनुसार, काही संशयास्पद मृत्यू प्रकरणांमध्ये मृतदेहाची बाह्य आणि अंतर्गत तपासणी करूनही मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होत नाही. अशा वेळी मृत व्यक्तीच्या शरीरातील काही अवयव आणि रक्ताचे नमुने पुढील प्रयोगशाळेतील तपासणीसाठी सुरक्षित ठेवले जातात. या प्रक्रियेला व्हिसेरा जतन करणे असे म्हणतात.

व्हिसेरा तपासणीच्या माध्यमातून मृत व्यक्तीला विष दिले होते का, शरीरात औषधांचे किंवा रासायनिक पदार्थांचे प्रमाण किती होते आणि मृत्यूचे नेमके कारण काय असू शकते, याचा शोध घेतला जातो. यासाठी पोट, आतडे, यकृत, मूत्रपिंड आणि इतर अवयवांचे नमुने तसेच रक्ताचे नमुने तपासले जातात.

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्यास त्याच्या स्थितीवरून मृत्यू किती काळापूर्वी झाला असावा, तसेच शरीरातील काही घटकांच्या तपासणीतून मृत व्यक्तीने शेवटच्या काळात काय सेवन केले असावे, याबाबतही महत्त्वाचे संकेत मिळू शकतात. इंजेक्शन दिल्याचा संशय असल्यास संबंधित त्वचेचा आणि मांसाचा नमुनाही तपासणीसाठी जतन केला जाऊ शकतो.
मुग्धा देशमुख मृत्यू प्रकरणात व्हिसेरा राखून ठेवल्यामुळे तपासाला महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, तिचा मृत्यू विषप्रयोगामुळे झाला की अन्य कोणत्या कारणामुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. पोलिसांकडूनही या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.






