पुणे: पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, पूरस्थिती आणि अपघाताच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मावळ तालुक्यातील अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पर्यटकांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.

प्रशासनाच्या आदेशानुसार लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना या किल्ल्यांवर तसेच भाजे धबधब्यावर पर्यटकांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे. पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे ही खबरदारीची उपाययोजना करण्यात आली आहे.

याशिवाय लोणावळा परिसरातील काही लोकप्रिय पर्यटनस्थळांवरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, शिवलिंग पॉइंट, एकवीरा देवी मंदिर आणि कार्ला लेणी परिसर तसेच पवना धरण परिसरातही पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, पावसामुळे दरडी कोसळण्याचा धोका, वेगवान पाण्याचा प्रवाह आणि घसरडे रस्ते यामुळे पर्यटकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
पर्यटकांनी या आदेशाचे पालन करावे आणि बंदी असलेल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.






