पुणे: तळेगाव, चाकण आणि (Pune Traffic Diversion) आळंदी नगरपरिषद निवडणूक 2025 ची मतमोजणी रविवारी 21 डिसेंबर रोजी पार (Pune News) पडणार आहे. मतमोजणी केंद्रांजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून तात्पुरते वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शहरातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहावी, यासाठी प्रमुख मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

तळेगाव नगरपरिषदेची मतमोजणी तळेगाव दाभाडे येथील नवीन नगरपरिषद इमारतीत होणार आहे. चाकण नगरपरिषदेची मतमोजणी चाकण मार्केट यार्ड समोरील मीरा मंगल कार्यालयात, तर आळंदी नगरपरिषदेची मतमोजणी आळंदी नगरपरिषद कार्यालयात होणार आहे. या तिन्ही ठिकाणी मतमोजणीदरम्यान मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. हे निर्बंध 21 डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहणार आहेत.
तळेगाव परिसरात जिजामाता चौक ते तळेगाव स्टेशन चौक दरम्यान दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. तसेच काळोखे वाडी, आदर्श विद्यालय गेट, वतननगर आणि हिंदमाता भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही निर्बंध असतील. या भागातील वाहतूक खांडगे पेट्रोल पंप, बेटी बचाओ सर्कल, मारुती मंदिर चौक, बीएसएनएल कॉर्नर, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि सिंडीकेट चौक मार्गे वळवली जाणार आहे.
चाकण वाहतूक विभागाच्या हद्दीत चाकण गावठाण आणि महात्मा फुले चौकातून येणाऱ्या वाहनांना मार्केट यार्ड आणि मार्केट यार्ड चौकाकडे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच खेड बाजूकडून येणाऱ्या वाहनांना चाकण शहरात प्रवेश दिला जाणार नाही. ही वाहतूक आंबेठाण पूल आणि नाशिक-पुणे महामार्ग मार्गे वळवण्यात येणार आहे.
दिघी-आळंदी वाहतूक विभागात मरकळ, वडगाव घेणंद, देहुफाटा, योगिराज चौक आणि नगरपरिषद चौक परिसरातील काही रस्ते तात्पुरते बंद राहणार आहेत. पुणे, चाकण आणि आळंदीच्या दिशेने जाणारी वाहने वडगाव चौक, चाकण चौक, चाळीस फुटी रोड, जोग महाराज धर्मशाळा आणि मरकळ-वडगाव मार्गे वळवली जाणार आहेत. वाहनचालकांनी या बदलांची नोंद घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी केले आहे.






