पुणे: रेल्वे प्रशासनाकडून तत्काळ (Railway Tatkal Booking) तिकीट बुकिंगची (Railway Booking) प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी महत्त्वाचा (Tatkal Ticket) बदल करण्यात येत आहे. तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आता ओटीपीद्वारे पडताळणीची नवी प्रणाली टप्प्याटप्प्याने लागू केली जात आहे. या नव्या पद्धतीचा उद्देश दलाल, बोगस बुकिंग आणि तांत्रिक गैरप्रकारांना आळा घालणे हा आहे. या बदलाअंतर्गत 19 डिसेंबरपासून पुण्याशी जोडलेल्या मध्य रेल्वेच्या आणखी पाच गाड्यांवर ओटीपी आधारित तत्काळ तिकीट बुकिंग प्रणाली लागू होणार आहे. (Breaking News)

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पुणे–अमरावती एक्सप्रेस 11025 आणि पुणे–सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस 12157 या गाड्यांवर ही नवी व्यवस्था लागू केली जाणार आहे. त्याचप्रमाणे सीएसएमटी–कोल्हापूर कोयना एक्सप्रेस 11029, लोकमान्य टिळक टर्मिनस–गोंडा गोदान एक्सप्रेस 11055 आणि लोकमान्य टिळक टर्मिनस–जयनगर एक्सप्रेस 11061 या गाड्यांचाही या यादीत समावेश आहे. या गाड्यांमध्ये तत्काळ तिकीट बुकिंग करताना ओटीपी पडताळणी अनिवार्य राहणार आहे.
नव्या नियमांनुसार प्रवासी आरक्षण काउंटरवर, अधिकृत रेल्वे एजंटकडे किंवा IRCTCच्या वेबसाइट आणि मोबाइल ॲपवरून तत्काळ तिकीट बुक करताना ओटीपी द्यावा लागणार आहे. तिकीट बुकिंगच्या वेळी प्रवाशाने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवण्यात येईल. तो ओटीपी योग्य पद्धतीने भरल्यानंतरच तत्काळ तिकीट निश्चित होणार आहे. ओटीपीशिवाय तिकीट बुकिंग पूर्ण होणार नाही.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, तत्काळ तिकीट बुकिंग करताना स्वतःचा चालू आणि योग्य मोबाईल क्रमांकच नोंदवावा. चुकीचा किंवा बंद मोबाईल क्रमांक दिल्यास ओटीपी मिळण्यात अडचण येऊ शकते आणि तिकीट बुकिंग अर्धवट राहण्याची शक्यता आहे. या नव्या व्यवस्थेमुळे तत्काळ तिकीट बुकिंग अधिक सुरक्षित होईल आणि सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा फायदा होईल, असा विश्वास मध्य रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.







