पुणे: तळेगाव एमआयडीसी (Pune Talegaon News) परिसरात शनिवारी (ता. 13) रात्री पिस्तूलाची स्टंटबाजी दोघा मित्रांना चांगलीच महागात पडली. मिंडेवाडी येथे परप्रांतीय युवकाने झुडपात लपवलेली विनापरवाना पिस्तूल काढून रस्त्यावर स्टंटबाजी सुरू केली. दरम्यान, पिस्तूलातून चुकून सुटलेली गोळी त्याच्या मित्रालाच लागली. या घटनेत तो युवक गंभीर जखमी झाला आहे.

जखमीचे नाव विजयकुमार (वय 28) असून, त्याच्यावर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसरा आरोपी मंजरिन रजिफ मिया (वय 24) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी विजयकुमारविरुद्ध शस्त्र कायदा कलम 3(25) अंतर्गत, तर मंजरिन रजिफ मियाविरुद्ध भा.दं.सं. 2023 कलम 125 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भाड्याने घरे देताना ओळखपत्रे व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी न करणाऱ्या घरमालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.







