पुणे: महानगरपालिका निवडणुकीच्या (Pune Politics) पार्श्वभूमीवर प्रचाराचा जोर वाढलेला (Pune Election) असताना पिंपरी-चिंचवड शहरात मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट सामना झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळच्या सुमारास भाजपचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते प्रभाग क्रमांक 9 मधील एका गृहनिर्माण सोसायटीत प्रचारासाठी गेले होते. मात्र, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांनी भाजप उमेदवारांनी या सोसायटीत प्रचार करू नये, अशी भूमिका घेतली. यावरून वाद निर्माण झाला आणि राष्ट्रवादीच्या काही समर्थकांनी थेट सोसायटीच्या मुख्य गेटला टाळे ठोकल्याचे सांगण्यात येत आहे.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांच्या समजावणीनंतर दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही हिंसक घटना घडली नाही तसेच कोणीही जखमी झाल्याची नोंद नाही.
दरम्यान, या प्रकारामुळे निवडणूक प्रचारादरम्यान वाढणाऱ्या तणावाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा घटना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतात, असे मत स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. प्रचारादरम्यान नियमांचे पालन व्हावे यासाठी निवडणूक आयोग आणि पोलिस प्रशासनाने अधिक कडक भूमिका घ्यावी, अशी मागणीही या घटनेनंतर पुढे येत आहे.







