Pune News: पुणे: मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सुशील मोहन भांडे यांचे हृदयविकाराच्या (Heart Attack) तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने मुंबई पोलीस दलात तसेच त्यांच्या मूळ गावी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात शोक व्यक्त केला जात आहे. शांत, संयमी आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.

सुशील भांडे हे मुंबईतील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. आपल्या सेवाकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या. त्यांनी काही काळ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे अंगरक्षक म्हणूनही काम केले होते. त्यांच्या कामातील शिस्त आणि निष्ठेमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये त्यांना विशेष मान होता.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून दुःख व्यक्त करण्यात आले. एक कर्तव्यदक्ष आणि मनमिळावू सहकारी गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर मोठा आघात झाला आहे.
दरम्यान, त्यांच्या मूळ गावी भोर तालुक्यातील भोंगवली येथेही शोककळा पसरली आहे. तरुण वयातच त्यांचे निधन झाल्याने गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. त्यांच्या पार्थिवावर भोंगवली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुंबई पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली.
शासकीय इतमामात आणि अश्रूंच्या वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अंत्यसंस्कारावेळी पोलीस अधिकारी, स्थानिक नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.






