Pune News: पुणे : पुणे शहरात एका ३९ वर्षीय तरुणाने घरगुती वादातून आपले जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला होता, मात्र नांदेड सिटी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याचे प्राण वाचवले आहेत. पोलिसांच्या या तत्परतेमुळे एका कुटुंबाचा आधार वाचला असून, या धाडसी कामगिरीबद्दल पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, लोहगाव पोलीस ठाण्याकडून नांदेड सिटी पोलिसांना एका तरुणाच्या आत्महत्येबाबत महत्त्वाची माहिती मिळाली होती. घरगुती त्रासामुळे निराश झालेला हा तरुण गळफास घेऊन आपले जीवन संपवण्याच्या विचारात होता. ही माहिती मिळताच नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. या पथकात पोलीस कर्मचारी मनोहर खराडे, शुभम चव्हाण आणि होमगार्ड रोहित राऊत यांचा समावेश होता.
पोलिसांनी संबंधित तरुणाचा मोबाईल क्रमांक मिळवून त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो तरुण पोलिसांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करत होता. पोलिसांनी तांत्रिक मदतीचा वापर करून त्याचे लोकेशन तपासले असता तो खडकवासला परिसरात असल्याचे समजले. पोलीस पथक तिथे पोहोचले असता तो तरुण तिथून दुसरीकडे निघून गेला होता. तरीही पोलिसांनी हार न मानता स्थानिक शेतकऱ्यांकडे चौकशी केली आणि शोध सुरूच ठेवला. अखेर अत्यंत शिताफीने या तरुणाला शोधून काढण्यात आले. पोलिसांनी त्याचे समुपदेशन करून त्याला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त केले.
वेळेत मिळालेली माहिती आणि पोलिसांनी दाखवलेली सतर्कता यामुळे एका व्यक्तीचे प्राण वाचवणे शक्य झाले आहे. या कारवाईमुळे पुणे पोलीस दलातील माणुसकीचे दर्शन पुन्हा एकदा घडले असून पीडित तरुणाच्या कुटुंबाने पोलिसांचे आभार मानले आहेत.







