Pune News: : पुणे: पुणे (Pune) पोलिसांच्या गुन्हे शाखेने कुख्यात गुन्हेगार सचिन घायवळला पकडण्यासाठी जामखेड तालुक्यात मोठी मोहीम राबवली, मात्र त्याला पकडण्यात पोलिसांना अपयश आले. सचिन घायवळ एका गावातील शेतात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने तिथे सापळा रचला होता, परंतु पोलीस येत असल्याची पूर्वकल्पना मिळाल्याने त्याने वेळेत तिथून पळ काढला. एका महिलेने सचिन घायवळला पोलीस कारवाईची माहिती देऊन पळून जाण्यास मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे.

माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला
गुन्हे शाखेला सचिन घायवळ हा जामखेड तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्या माहितीनुसार विशेष पथक तयार करून संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. मात्र पोलिस गावात पोहोचल्याची चाहूल लागताच सचिन सतर्क झाला आणि काही क्षणांतच तो घटनास्थळावरून फरार झाला. पोलिस त्याच्या अगदी जवळ पोहोचले होते, मात्र वेळेवर मिळालेल्या माहितीतून तो निसटण्यात यशस्वी ठरला.
दरम्यान, सचिनला पळून जाण्यास मदत केल्याचा संशय असलेली महिला पोलिसांच्या रडारवर आली आहे. या महिलेची ओळख पटवून तिला ताब्यात घेऊन चौकशी करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून कोणत्या माध्यमातून माहिती पोहोचली, याचा शोध घेतला जात आहे.
सचिन घायवळ हा कुख्यात गुंड नीलेश घायवळचा मोठा भाऊ आहे. दोघांविरोधात वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात खंडणीचा गंभीर गुन्हा दाखल आहे. कर्वेनगर आणि शिवणे परिसरातील एका नामवंत शाळेसाठी खाद्यपदार्थ आणि वाहतूक सेवा पुरवणाऱ्या खासगी कंपनीच्या संचालक महिलेकडून 44 लाख 36 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणात 13 जणांविरोधात गुन्हा दाखल असून सचिनवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर तो पुण्यातून फरार झाला.
दुसरीकडे, नीलेश घायवळ अद्याप विदेशात फरार असून तो लंडनमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती आहे. कोथरूड गोळीबार प्रकरण आणि बनावट पासपोर्ट प्रकरणात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने त्याला फरार घोषित केले असून त्याच्या मालमत्तेवर कारवाई सुरू आहे. प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसांनी ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. तसेच नीलेशला आश्रय दिल्याप्रकरणी त्याच्या मुलाविरोधात कारवाई करता येईल का, याचीही पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे.






