Pune News: पुणे, ता. 17 : परदेश प्रवास, व्हिसा, खासगी-सरकारी नोकरी तसेच विविध शासकीय प्रक्रियांसाठी चारित्र्य पडताळणी दाखला आता अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक अर्जदाराला पोलीस क्लिअरन्स सेवा घ्यावी लागत आहे. मात्र सध्या राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (एमआयसी) यांच्या प्रणालीत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने ऑनलाईन चारित्र्य पडताळणी सेवा तात्पुरती बंद आहे. त्यामुळे गरजू नागरिकांना ऑफलाईन चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दिले जात असल्याची माहिती पुणे शहर पोलीस विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी दिली.

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ अंतर्गत एनआयसी सेवेमध्ये तांत्रिक समस्यांमुळे डिजिटल सिग्नेचर कॅप्चर होत नसून, परिणामी क्यूआर कोड किंवा व्हेरिफिकेशन कोड जनरेट होत नाही. त्यामुळे सध्या ऑनलाईन चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देणे शक्य नाही. ही सेवा सुरळीत व्हावी यासाठी महाआयटीकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने सही व शिक्क्यासह ऑफलाईन चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. ज्यांना तातडीने प्रमाणपत्राची आवश्यकता आहे, त्यांनी या ऑफलाईन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजीभाकरे यांनी केले आहे.
पुढे बोलताना संदीप भाजीभाकरे म्हणाले की, सामान्यतः चारित्र्य पडताळणीचे प्रमाणपत्र एका महिन्यात दिले जाते. यापूर्वी ही प्रक्रिया 15 ते 20 दिवसांत पूर्ण होत होती. मात्र सध्याच्या तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र मिळण्यास अधिक कालावधी लागू शकतो. क्यूआर कोड किंवा ऑनलाईन व्हेरिफिकेशन अनिवार्य असणाऱ्या अर्जदारांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण सध्या कोणत्याही माध्यमातून डिजिटल पडताळणी शक्य होत नाही.
दरम्यान, महा ऑनलाईन कडून ही सेवा लवकरच पूर्ववत होईल, अशी सकारात्मक माहिती मिळाली आहे. तोपर्यंत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे, संयम राखावा आणि अत्यावश्यक कामांसाठी ऑफलाईन प्रमाणपत्राचा पर्याय स्वीकारावा, असे आवाहनही भाजीभाकरे यांनी केले आहे.
ऑनलाईन सेवा कधी सुरू होणार?
गेल्या महिनाभरापासून पुणे शहरात चारित्र्य पडताळणीची ऑनलाईन सेवा पूर्णतः ठप्प आहे. त्यामुळे नोकरी, व्हिसा, शिक्षण व परदेश प्रवासाशी संबंधित हजारो अर्ज रखडले असून, या विलंबामुळे सामान्य नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. “ऑनलाईन सेवा नेमकी कधी सुरू होणार?” हा प्रश्न आता पुणेकरांचा सामूहिक आक्रोश बनला आहे.






