पुणे: पुणे (Pune News) महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, उमेदवारांनी जाहीर केलेल्या संपत्तीच्या तपशिलामुळे सध्या शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीत अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींचे मुलं-सुनांना उमेदवारी देण्यात आली असून, यात प्रामुख्याने आमदार बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. सुरेंद्र पठारे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात कुटुंबाची एकूण मालमत्ता 271 कोटी 85 लाख रुपये असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्याकडे मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू सारख्या महागड्या गाड्यांचा ताफा असून, त्यातील स्थावर मालमत्ताच 217 कोटी रुपयांची आहे.

या यादीत दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची कन्या सायली वांजळे यांचाही समावेश असून त्यांची मालमत्ता 77 कोटी 65 लाख रुपये इतकी आहे. तसेच दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांनी आपली संपत्ती 11 कोटी 22 लाख रुपये असल्याचे नमूद केले आहे. या ‘हाय-प्रोफाईल’ उमेदवारांमध्ये बहुतांश जण कोट्यधीश आहेत. सर्वाधिक श्रीमंत ठरलेल्या सुरेंद्र पठारे यांनी बी.टेक. पर्यंत शिक्षण पूर्ण केले असून त्यांच्यावर सुमारे 46 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचेही स्पष्ट झाले आहे. स्थावर मालमत्तेमध्ये त्यांच्याकडे प्रामुख्याने जमिनी आणि व्यावसायिक इमारतींचा मोठा वाटा आहे.
पुणे महापालिकेच्या या निवडणुकीत कुणाल टिळक, चंद्रशेखर निम्हण आणि रवींद्र धंगेकर यांच्यासारख्या अनेक प्रस्थापितांच्या वारसदारांचे भवितव्य पणाला लागले आहे. या उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमुळे पुण्यातील राजकीय कुटुंबांची आर्थिक ताकद पुन्हा एकदा समोर आली आहे. आता या कोट्यधीश वारसदारांना पुण्यातील जनता निवडून आणणार का की नवीन उमेदवाराला संधी देणार? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.






