Pune News : पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) मोठा निर्णय घेतला आहे. या भागातील प्रमुख पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी सुमारे 67 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या कामांमुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या प्रकल्पांतर्गत रस्ते सुधारणा, पार्किंगची सोय, स्वच्छता आणि सुरक्षा यावर विशेष भर दिला जाणार आहे. खडकवासला धरण परिसरात सुमारे 1 कोटी रुपये खर्चून चौपाटी विकसित केली जाणार आहे. तसेच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी धरणाच्या कडेला संरक्षक कुंपण उभारले जाणार आहे. यामुळे गर्दी आणि अपघात टाळण्यास मदत होईल.
गड-किल्ल्यांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्यांची सुधारणा केली जाणार आहे. राजमाची किल्ल्यासाठी 14 किमी रस्त्यासाठी 17 कोटी, लोहगड किल्ल्यासाठी 5.50 किमी रस्त्यासाठी 7 कोटी, तिकोना आणि पवना परिसरासाठी 6.50 किमी रस्त्यासाठी 8 कोटी, तर तुंग किल्ल्यासाठी 4 किमी रस्त्यासाठी 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय मुगाव ते ताम्हिणी घाट या मार्गासाठीही 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
लोणावळ्यात भविष्यात पर्यटकांसाठी स्कायवॉक उभारला जाणार असून तो मोठे आकर्षण ठरणार आहे. मुळशी तलाव परिसरात सुशोभीकरण आणि पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच पळशे धबधबा परिसरात सुरक्षेसाठी जाळ्या आणि रेलिंग बसवले जाणार आहेत.
धार्मिक स्थळांचाही विकास करण्यात येणार असून त्यासाठी 47 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यात मंदिर परिसरात स्वच्छता, पिण्याचे पाणी, वाहनतळ आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
याशिवाय पर्यावरण संरक्षणासाठी खडकवासला आणि पवना धरण परिसरातील गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवला जाणार आहे. यामुळे पाण्याचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.







