पुणे: पुणे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटच्या (Pune News) रडारवर आले आहे. लोहगाव विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने (कस्टम्स) गुरुवारी एक मोठी कारवाई करत तब्बल 26 कोटी 80 लाख रुपयांचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त केला. ‘चिनी खाद्यपदार्थ’ असल्याचा बनाव करून हा साठा थेट थायलंडमधून पुण्यात पाठवण्यात आला होता.

थायलंडहून एअर कार्गोद्वारे आलेल्या एका कंटेनरने अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. कागदपत्रांवर या मालाचे वर्णन ‘मँडरिन ऑरेंज सॅक्स’ (एक प्रकारचे चिनी खाद्यपदार्थ) असे करण्यात आले होते. पांढऱ्या थर्माकोल बॉक्समध्ये पॅक केलेला हा माल वरवर सुरक्षित वाटत असला, तरी स्कॅनिंग दरम्यान त्यात काहीतरी संशयास्पद गोष्ट असल्याचे दिसून आले. संशय बळावल्याने जेव्हा हे बॉक्स उघडले, तेव्हा तस्करीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
तस्करांनी तपास यंत्रणांना गुंगारा देण्यासाठी सीलबंद टिनच्या डब्यांमध्ये वरच्या बाजूला मिठासारखी पांढरी पावडर भरली होती. ही पावडर बाजूला केल्यावर खाली व्हॅक्युम सीलबंद प्लास्टिक पाकिटांमध्ये 76.58 किलो उच्च दर्जाचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ लपवलेला आढळला.
सामान्य गांजाच्या तुलनेत ‘हायड्रोपोनिक गांजा’ची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड असते. हा गांजा मातीविना, केवळ नियंत्रित वातावरणात वाढवला जातो. यात नशिल्या द्रव्याचे प्रमाण खूप जास्त असल्याने याला मोठी मागणी असते. दरम्यान, हे पॅक नेमकं कोणाला पाठवला जात होता. याबद्दल अधिक तपास करत आहेत.







