पुणे: पुण्यातील (Pune News) कात्रज परिसरात डॉक्टरला रुग्ण तपासणीच्या बहाण्याने बोलावून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ३१ डिसेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास दोन अनोळखी तरुण डॉक्टरांच्या दवाखान्यात आले. एक रुग्ण अतिशय गंभीर असून त्याला तातडीने तपासण्याची गरज आहे, अशी खोटी बतावणी त्यांनी केली. एका ४९ वर्षीय डॉक्टरांनी माणुसकी दाखवत त्यांच्यासोबत जाण्याचे मान्य केले, पण पुणे-सातारा रस्त्यावरील अथर्व परिहाज इमारतीच्या निर्जन ठिकाणी नेताच चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवला.

दरम्यान, झटापटीत एका चोरट्याने चाकूने वार करून डॉक्टरांना जखमी केले. त्यानंतर चोरट्यांनी डॉक्टरांची दुचाकी, मोबाईल, ३० हजार रुपयांची रोकड आणि पिशवीतील १ लाख रुपये किमतीचा चांदीचा जग असा मोठा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून नेला. या घटनेमुळे डॉक्टर प्रचंड दहशतीखाली होते. त्यांनी याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपींचा शोध सुरू केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके चोरट्यांच्या मागावर आहेत. सध्या पोलीस उपनिरीक्षक सद्दाम फकीर या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, डॉक्टरांना अशा प्रकारे लक्ष्य केल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.







