पुणे: पुणे (Pune News) महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत हडपसर परिसरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रभाग क्रमांक 41 मधील अपक्ष उमेदवार सादिक उर्फ बाबू कपूर यांनी स्वतःच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सादिक यांचे वय 56 वर्षे असून मतदानाच्या काही दिवस आधीच त्यांनी उचललेल्या या टोकाच्या पाऊलामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून घटनास्थळावरून काही महत्त्वपूर्ण धागेदोरे हाती लागले आहेत.

सादिक यांनी मृत्यूपूर्वी 30 पानांची एक सविस्तर सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यांनी स्वतःच्या हातावर काही लोकांची नावे लिहिल्याचे तपासात उघड झाले आहे. या सुसाईड नोटमध्ये सादिक यांनी आपल्या मृत्यूसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार फारुख शेख यांना जबाबदार धरल्याचा गंभीर आरोप केला आहे. “फारुख शेख यांच्या त्रासाला कंटाळून मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे,” असे सादिक यांनी लिहिले आहे या पत्रात इतरही काही प्रभावशाली व्यक्तींची नावे असल्याची माहिती समोर येत असून पोलिसांनी ती सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन गुन्हा दाखल केला असून सुसाईड नोटमधील मजकुराची चौकशी सुरू केली आहे. निवडणुकीच्या काळात एका उमेदवाराने प्रतिस्पर्धी उमेदवाराचे नाव लिहून आत्महत्या केल्यामुळे या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण प्राप्त झाले असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







