Pune Municipal Corporation Elections: पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मकोका कायद्यांतर्गत आरोपी असलेल्या गजानन मारणेला उच्च न्यायालयाने दोन दिवस पुण्यात येण्याची परवानगी दिली आहे. गजानन मारणे याला गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस शहरात राहता येणार आहे.

कोथरूड भागात एका आयटी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात गजानन मारणे आणि त्याच्या टोळीतील १० जणांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात त्याला सत्र न्यायालयाने जामीन दिला होता, मात्र उच्च न्यायालयातील याचिकेचा निकाल लागेपर्यंत सुनावणीच्या तारखेव्यतिरिक्त पुणे महानगरपालिका हद्दीत प्रवेश करण्यास त्याला बंदी घालण्यात आली होती.
गजानन मारणेची पत्नी जयश्री मारणे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे राजकारणात मोठी चर्चा सुध्दा झाली. पत्नीचा प्रचार करण्यासाठी आणि स्वतःचे मतदान करण्यासाठी पुण्यात येण्याची परवानगी मिळावी अशी विनंती त्याने सुरुवातीला पुण्याच्या विशेष न्यायालयाकडे केली होती. मात्र विशेष न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावली होती. त्यानंतर मारणे याने वकील विजयसिंह ठोंबरे यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने मारणेच्या जामिनाच्या अटींचे पालन झाल्याचे लक्षात घेऊन केवळ मतदानासाठी दोन दिवस शहरात येण्याची मुभा दिली आहे.

गजानन मारणेची कोथरूड परिसरात दहशत असल्याचे बोलले जाते. त्याने काही लोकांना फोन केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला यापूर्वीच समज दिली होती. निवडणूक काळात शांतता बिघडल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे. गुन्हे शाखेचे पथक मारणेच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे.




