Pune Metro : पुणे शहरात सध्या मेट्रोचे दोन मार्ग सुरू आहेत. मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेली खाजगी वाहनांची संख्या आणि अपुरी सार्वजनिक वाहतूक यामुळे शहरात मेट्रोचे आणखी मार्ग सुरू होणं गरजेचं बनलं आहे. आता या पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दोन मार्गांनंतर आता तिसरी मेट्रो लाईन लवकरच सुरू होणार आहे. (Pune Metro)

हिंजवडी ते शिवाजीनगर ही मेट्रो लाईन 3 पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे. सुमारे 23.3 किलोमीटर लांबीचा हा मार्ग मार्च 2026 पर्यंत सुरू होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या मार्गामुळे हिंजवडीतील आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसंच, या लाईनमुळे सध्या सुरू असलेल्या इतर मेट्रो मार्गांवरही प्रवासीसंख्या वाढण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोचं काम वेळेत पूर्ण करून 31 मार्चपर्यंत सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या मार्गिकेमुळे हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क थेट शहराशी जोडला जाणार आहे. शिवाय, ही लाईन सध्या सुरू असलेल्या मेट्रो लाईन 1 आणि लाईन 2 शी सिव्हिल कोर्ट स्टेशनजवळ स्कायवॉकच्या माध्यमातून जोडली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना एका लाईनवरून दुसऱ्या लाईनवर जाणं अधिक सोपं होणार आहे.
आणखी दोन मार्गांना केंद्राची मंजुरी
केंद्र सरकारने पुणे मेट्रोच्या आणखी दोन विस्तार मार्गांना मंजुरी दिली आहे. पिंपरी-चिंचवड ते निगडी आणि खराडी ते खडकवासला या मार्गांचा त्यात समावेश आहे. पिंपरी-चिंचवड ते निगडी मार्गाचं काम वेगाने सुरू असून, ते सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मेट्रो मार्गाचं काम काही तांत्रिक अडचणींमुळे सध्या रखडलं आहे. मात्र रामवाडी ते वाघोली आणि वनाज ते चांदणी चौक या मार्गांचं काम लवकरच सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
पुणे मेट्रोचा मोठा विस्तार आराखडा
पुणे मेट्रोच्या विस्तारासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, रामवाडी–वाघोली आणि वानवडी–चांदणी चौक या मार्गांवर लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. याशिवाय, पुढील काही नवीन मार्गांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याची तयारी सुरू आहे.
यामध्ये
-
वडगाव ते कात्रज (मुंबई–बंगळूर बायपास मार्गे),
-
वडगाव ते चाकण,
-
खराडी ते पुणे विमानतळ,
-
शिवाजीनगर ते कोंढवा,
-
हडपसर ते लोणी काळभोर,
-
आणि हडपसर ते सासवड रोड रेल्वे
या मार्गांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
पुणे मेट्रोच्या या सर्व विस्तारांमुळे शहराच्या विविध भागांना एकमेकांशी जोडणं सोपं होणार असून, प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. तसंच, शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासही मोठी मदत होणार आहे.







