पुणे: पुण्यात सायबर चोरट्यांनी (Pune Cyber Crime) नवीन डाव रचत नागरिकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे. प्रभात रस्ता परिसरात राहणाऱ्या एका तरुणाची गॅस पुरवठा खंडित करण्याची बतावणी करून तब्बल एक लाख एक हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक (Pune Cyber Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण प्रभात रस्ता परिसरातील एका सोसायटीत राहतो. चोरट्यांनी त्याच्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवला की, “आपले एमएनजीएलचे देयक थकले असून, ते भरले नाही तर गॅस पुरवठा बंद करण्यात येईल.” या संदेशावर विश्वास ठेवून तरुणाने दिलेल्या लिंकवर क्लिक केले. त्यानंतर चोरट्यांनी त्याला एक एपीके फाइल पाठवली.

तरुणाने ती फाइल उघडताच त्याच्या मोबाईलमधील गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती लागली. त्या माहितीच्या आधारे चोरट्यांनी त्याच्या बँक खात्यातून 1,01,000 ची रक्कम पळवली. आपली फसवणूक झाली असल्याचे तरुणाच्या लक्षात आल्यानंतर त्याने तात्काळ डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर करत आहेत.







