अमित मुंडीक

पुणे: युनिट-४, गुन्हे शाखा, पुणे शहर पोलीस (Pune Crime) यांनी वृद्ध इसमास रिक्षामधून सोडण्याच्या बहाण्याने त्याच्या सामानातील रोख रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. खडकी पोलीस ठाणे गु.र.नं. २१/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०३ (२), ३४ अन्वये दि. १२/०२/२०२६ रोजी दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले होते.
दि. १३/०२/२०२६ रोजी पथक खडकी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार सुभाष आव्हाड व किशोर दुशिंग यांना गोपनीय माहिती मिळाली की, वाकडेवाडी बसस्टॅन्ड परिसरात चोरी करणारा इसम रिक्षा (एमएच/१२/एचसी/४१०७) घेऊन येणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून रिक्षा थांबविण्यात आली. चौकशीत आरोपी इदरीश शफिक शेख (वय ३६, रा. बावधान, पुणे; मुळ रा. बिजनौर, उत्तरप्रदेश) असल्याचे निष्पन्न झाले.
विश्वासात घेऊन चौकशी केली असता आरोपीने साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. दोन पंचांसमक्ष झडती घेतली असता चोरीस गेलेल्या रकमेपैकी २४,५०० रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण १,४९,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपासासाठी आरोपीस खडकी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.







