पुणे: पुण्यातील वाघोली परिसरात एका गृहनिर्माण (Pune Crime) सोसायटीमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी वाघोली पोलिसांनी तिथल्याच एका रखवालदाराला अटक केली आहे. अरविंद अरुण तिवारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मुळचा मध्य प्रदेशातील सतना येथील रहिवासी आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने वाघोली पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वाघोलीतील एका नामांकित सोसायटीत आपल्या कुटुंबासह राहते. आरोपी अरविंद तिवारी याच सोसायटीमध्ये रखवालदार म्हणून काम करत होता. गुरुवारी, ८ जानेवारी रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास पीडित मुलगी नेहमीप्रमाणे सोसायटीच्या आवारात खेळत होती. यावेळी आसपास कोणीही नसल्याचा फायदा घेत तिवारीने मुलीला गाठले आणि तिच्याशी अश्लील कृत्य केले. या प्रकारामुळे मुलगी प्रचंड घाबरली आणि तिने तातडीने तिथून पळ काढत घरी जाऊन आपल्या आईला सर्व हकीकत सांगितली.
आपल्या मुलीसोबत घडलेला हा धक्कादायक प्रकार ऐकल्यानंतर आईने ही माहिती सोसायटीतील इतर रहिवाशांना दिली. त्यानंतर संतप्त झालेल्या रहिवाशांनी एकत्र येत रखवालदार तिवारी याला गाठून या कृत्याबाबत जाब विचारला. आरोपीने गुन्हा केल्याचे लक्षात येताच नागरिकांनी त्याला पकडून ठेवले आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले.
वाघोली पोलिसांनी याप्रकरणी आरोपी अरविंद तिवारी याच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये म्हणजेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अशा घटनांमुळे गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रखवालदारानेच अशा प्रकारचे कृत्य केल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.







