Pune Crime : पुणे : पुणे (Pune) शहरातील कात्रज-कोंढवा रोड परिसरात एका 20 वर्षीय तरुणाचे अपहरण (Kidnapping) करून त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. येवलेवाडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना अटक केली असून या घटनेत तीन अल्पवयीन मुलांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 27 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास गोकुळनगर भागात ही घटना घडली. सार्थक राजाराम पाटील (वय 20) याला आरोपींनी पार्सल देण्याच्या कारणावरून बोलावले. जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून हा कट रचल्याचे सांगितले जात आहे. सार्थक ठरलेल्या ठिकाणी पोहोचताच आरोपींनी त्याची दुचाकी अडवली आणि जबरदस्तीने त्याला त्यांच्या वाहनावर बसवून नेले.
यानंतर त्याला पर्वती परिसरातील लक्ष्मीनारायण थिएटर आणि मित्र मंडळ चौक परिसरात नेण्यात आले. तेथे त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत त्याच्या मित्राला तेथे बोलावण्यास भाग पाडले. त्याचा मित्र प्रतीक पाटील घटनास्थळी आल्यानंतर आरोपींनी त्याच्याकडील सुमारे 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि वाहनाची चावी जबरदस्तीने घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी पोलिसांनी शाहू पोपट निंबाळकर (वय 19), सोहम राहुल पारखे (वय 19) आणि सनी संजय दुसुंगे (वय 20) यांना अटक केली आहे. अटक केलेल्या तिघांवर यापूर्वीही काही किरकोळ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास येवलेवाडी पोलीस करत आहेत.







