पुणे: पुण्यातील रेल्वे स्थानक परिसरात (Pune Crime News) घडलेला एक गंभीर प्रकार समोर आला आहे. नांदेडवरून कामासाठी पहाटे पुण्यात आलेल्या एका तरुणाला तिघांनी अडवून धमकावले. त्याच्याकडे पैसे मागण्यात आले, मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिल्यावर तिघांनी त्याला बेदम मारहाण केली आणि पोटात चाकूने वार करून गंभीर जखमी केले. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

या प्रकरणी संतोष अमित जाधव (वय 22, रा. गंगानगर, ता. किनवट, जि. नांदेड) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना 9 सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे 5 वाजता पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून पार्सल विभागाकडे जाणाऱ्या व्हीआयपी स्लायडींगच्या ठिकाणी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष जाधव हे कामानिमित्त नांदेडवरून पुण्यात आले होते. पहाटे रेल्वेने उतरल्यावर ते बाहेर जात असताना तिघांनी त्यांना वाटेत अडवले. त्यांनी पैशांची मागणी केली. मात्र, जाधव यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये एकाने चाकू काढून जाधव यांच्या पोटात वार केला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले.

जखमी अवस्थेत त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून, बंडगार्डन पोलिसांनी तिघा आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.







