Pune Crime News : पुणे : महर्षीनगर परिसरात खाद्यपदार्थांच्या दरावरून झालेल्या वादातून उपाहारगृह चालक आणि त्याच्या सहकाऱ्यावर हल्ला केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या प्रकरणात तिघा हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

या घटनेत किशोर बनसोडे (वय 29) आणि प्रसाद आजुरे (वय 28) हे दोघे जखमी झाले आहेत. दोघांनाही उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बनसोडे आणि आजुरे यांचे महर्षीनगर भागात छोटे उपाहारगृह आहे. त्यांच्या दुकानासमोर एक व्यक्ती हातगाडीवर खाद्यपदार्थ विक्री करत होता.
व्यवसायातील स्पर्धेमुळे दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. यामध्ये खाद्यपदार्थांच्या दरावरूनही मतभेद झाले होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी आरोपी आपल्या साथीदारांसह उपाहारगृहात घुसले. त्यांनी धारदार शस्त्रे आणि दांडक्याने दोघांवर हल्ला केला.
या हल्ल्यात प्रसाद आजुरे यांनी हातावर वार झेलल्यामुळे त्यांचा हात गंभीर जखमी झाला असून मनगटाला दुखापत झाली आहे. किशोर बनसोडे यांनाही डोक्यावर आणि शरीरावर मार लागला आहे. दोघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.







