अमित मुंडीक

पुणे: पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी (Pune Crime) विरोधी पथक–२ ने सिंहगड रोड परिसरात मोठी कारवाई करत देशी बनावटीचे पिस्टल, जिवंत काडतूस व गांजा बाळगणाऱ्या दोन इसमांना जेरबंद केले आहे. ही कारवाई महिला पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. (Latest Marathi News)
पेट्रोलिंगदरम्यान पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे व प्रशांत शिंदे यांना गोपनीय बातमी मिळाली की, सर्वे नं. २९/१/२, जाधव नगर, नांदेड फाटा, सिंहगड रोड येथील जोएल कोरेश संकुल, ए विंग, पाचवा मजला, फ्लॅट क्र. ४१ मध्ये काही तरुण एकत्र जमले असून त्यांच्या ताब्यात गावठी पिस्टल आहे. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने सदर फ्लॅटवर छापा टाकून तपासणी केली.
तपासणीदरम्यान फ्लॅटमध्ये आर्यन राहुल सातपुते (वय १९, रा. सदर) व एक विधीसंघर्षित बालक असे दोन जण आढळून आले. फ्लॅटची झडती घेतली असता वॉशिंग मशीनच्या आत लपवून ठेवलेले ०१ गावठी पिस्टल व ०१ जिवंत काडतूस (किंमत अंदाजे ४०,५०० रुपये) तसेच १५९ ग्रॅम गांजा (किंमत सुमारे २,००० रुपये) असा एकूण ४२,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. ३०१/२०२५ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), १३५ तसेच एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(ii)(अ), २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे व मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे–२ श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सदर कामगिरीत महिला पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांच्यासह पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, अजिनाथ येडे, दिलीप गोरे, अनिल कुसाळकर, अमोल घावटे, सुजीत वाघमारे, आझाद पाटील, पवन भोसले, शेखर खराडे, प्रशांत शिंदे, चेतन आपटे व उदय राक्षे यांनी सहभाग घेतला.







