प्रतिनिधी अमित मुंडीक
Pune Crime : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाकडून कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत नाकाबंदी, गुन्हेगार तपासणी व सातत्यपूर्ण गस्त घालण्यात येत असून हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतही पेट्रोलिंग वाढविण्यात आली आहे.

या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड व पोलीस अंमलदारांचे पथक गोंधळेनगर परिसरात पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार कुंडलीक केसकर व तुकाराम झुंजार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिस रेकॉर्डवरील आरोपी रोहन राजकुमार गायकवाड (वय २० वर्षे, रा. गोंधळेनगर, हडपसर, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले.
आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस असा सुमारे ५१,२०० रुपये किमतीचा शस्त्रसाठा मिळून आला. याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १०९९/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) व मपोका कलम ३७ (१) (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी करीत आहेत.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ६ डॉ. सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले व पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.






