पुणे: पुण्यात वृद्ध महिलांना लक्ष्य करून (Pune Crime) हातचलाखीने दागिने चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्या झडतीदरम्यान बनावट सोन्याची बिस्किटे आणि अन्य साहित्य आढळून आले असून या कारवाईमुळे कराड शहरातील एक गुन्हाही उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 12 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Latest Marathi News)

अटक करण्यात आलेल्यांची नावे दिलीप विश्वनाथ स्वामी उर्फ जाधव (वय 52, रा. जळकोट, जि. लातूर) आणि अमोल बाबू गिरी (वय 53, रा. अहमदपूर, जि. लातूर) अशी आहेत. दिलीप स्वामी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर लातूरसह राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत अॅट्रोसिटी, अपहरण आणि फसवणूक यांसारखे गंभीर गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस अंमलदार नितीन मुंढे आणि कानिफनाथ कारखिले हे हडपसर परिसरातील भाजी मंडई भागात गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार रेकॉर्डवरील आरोपी दिलीप स्वामी हा त्याच्या साथीदारासह साधना विद्यालयाकडे जाणाऱ्या कॅनॉल रोड परिसरात चोरीच्या तयारीत असल्याचे समजले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन पोलिसांनी सापळा रचत दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपींनी 24 जुलै 2025 रोजी सकाळी सुमारे 11:15 वाजता प्रेमळ विठ्ठल मंदिराजवळील फुटपाथ परिसरात एका वृद्ध महिलेला फसविल्याची कबुली दिली. तेथे जेवण वाटप सुरू असल्याचे सांगून गर्दी होईल, त्यामुळे गळ्यातील सोन्याची पोत पिशवीत ठेवावी असा सल्ला देत त्यांनी हातचलाखीने ती पिशवी लांबवली होती. या संदर्भात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी आरोपींची झडती घेतली असता त्यांच्या खिशात सोन्यासारखी दिसणारी पिवळ्या धातूची दोन बनावट बिस्किटे आणि एक बेनटेक्सची चैन आढळून आली. पुढील चौकशीत त्यांनी एर्टिगा कारने प्रवास करत कराड येथेही अशाच प्रकारे एका वृद्ध महिलेला बनावट सोन्याची बिस्किटे दाखवून तिच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र काढून घेतल्याचे समोर आले. या प्रकरणात कराड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव तसेच पोलीस कर्मचारी नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले, चेतन आपटे, विनोद महाजन, गणेश खरात आणि आझाद पाटील यांनी केली. पोलिसांकडून या दोन्ही आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.







