Pune Crime : येरवडा परिसरामध्ये जुन्या वैमनस्यातून व स्वतःची दहशत निर्माण करण्याच्या इराद्याने वाहनांची तोडफोड करून नागरिकांमध्ये भीती पसरवणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला येरवडा पोलिसांनी (Yerwada Police) मोठ्या प्रयत्नांनी अटक केली आहे. हा आरोपी यापूर्वी ‘मोक्का’ (MCOCA) आणि ‘एमपीडीए’ (MPDA) सारख्या कठोर कायद्यांखाली कारवाई झालेला असतानाही जामिनावर बाहेर आला होता. त्याने पुन्हा गुन्हेगारी कारवाया सुरू करून जणू पोलिसांच्या कारवाईलाच आव्हान दिले होते. Pune Crime

समीर शब्बीर शेख (वय २७, रा. जयजवाननगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. समीर शेख आणि त्याच्या साथीदारांनी काही महिन्यांपूर्वी कामराजनगर परिसरात दहशत माजवत एका फिर्यादीला शिवीगाळ केली आणि लोखंडी शस्त्राने मारण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही, तर परिसरातील रिक्षा व इतर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडून त्यांनी मोठे नुकसान केले. हातात धारदार शस्त्रे हवेत फिरवत ‘मी इथला भाई आहे’ असे म्हणत या गुंडांनी वस्तीत आरडाओरडा करून नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण केली होती.
या गंभीर घटनेनंतर येरवडा पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करत शेखच्या काही साथीदारांना अटक केली होती, मात्र मुख्य आरोपी समीर शेख हा तेव्हापासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता. तो लोहगाव भागातील पवार वस्ती येथील आपल्या एका मित्राला भेटायला येणार असल्याची गोपनीय माहिती येरवडा पोलिस ठाण्यातील अंमलदार अमोल गायकवाड यांना मिळाली. या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारावर, पोलिस उपनिरीक्षक महेश फटांगरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने लोहगाव परिसरात सापळा रचला.
पोलिसांनी अत्यंत चलाखीने नियोजन करून अखेर दोन महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगार समीर शेख याच्या मुसक्या आवळल्या.पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपी शेखने कबूल केले की, जुन्या भांडणाच्या रागातून आणि विशेषतः स्वतःच्या नावाची दहशत परिसरात टिकवून ठेवण्यासाठी त्याने हा गुन्हा केला होता. ‘मोक्का’ आणि ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत कठोर कारवाई होऊनही आरोपीने पुन्हा गुन्हेगारी मार्गाचा अवलंब केल्याने, येरवड्यातील नागरिकांनी पोलिसांकडे अशा गुंडांवर वचक बसवण्यासाठी आणखी कठोर पाऊले उचलण्याची मागणी केली आहे. येरवडा पोलिसांनी केलेल्या या महत्त्वपूर्ण कारवाईमुळे परिसरात शांतता व सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आहे.







