पुणे: देहुरोड परिसरात विनानंबर प्लेटची मोटारसायकल चालवणाऱ्या तरुणाला अडविल्यानंतर वाहनचोरीच्या मालिकेचा पर्दाफाश झाला आहे. देहुरोड पोलिसांनी तिघांना अटक करत एकूण 6 गुन्हे उघडकीस आणले असून 5 मोटारसायकली आणि 1 रिक्षा असा सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहर व उपनगरात वाढलेल्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये ईश्वर संदीप गजे (वय 22, रा. खालुंब्रे, ता. खेड; मुळ रा. शिवाजीनगर बसस्टँड मागे, अकोले, जि. अहिल्यानगर), अनिकेत ऊर्फ संतोष विटकर (वय 20, रा. देहुगाव) आणि आर्यन ऊर्फ एस. पी. आनंदा राऊत (वय 19, रा. भारतमाता चौक, मोशी) यांचा समावेश आहे. पोलिस नोंदीनुसार अनिकेत विटकर याच्याविरोधात 2024 मध्ये खुनाचा प्रयत्न आणि 2025 मध्ये दोन चोरीचे गुन्हे दाखल आहेत, तर आर्यन राऊत याच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टखाली गुन्हा आहे.
27 जानेवारी रोजी देहुगाव परिसरात पेट्रोलिंगदरम्यान परंडवाल चौकाकडून पेट्रोल पंपाकडे विनानंबर प्लेटची मोटारसायकल जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वर्णनावरून ईश्वर गजे याला थांबवण्यात आले. चौकशीत त्याच्याकडील मोटारसायकल देहुरोड परिसरातून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. पुढील चौकशीत त्याने अनिकेत विटकर आणि आर्यन राऊत यांच्यासह वाहनचोरी करत असल्याची कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी उर्वरित दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या सांगण्यावरून आणखी 4 मोटारसायकली आणि 1 रिक्षा जप्त केली. तपासात खडक व सिंहगड पोलीस ठाण्यात प्रत्येकी 1, तर दिघी आणि देहुरोड पोलीस ठाण्यात प्रत्येकी 2 असे एकूण 6 गुन्हे उघडकीस आले. एका मोटारसायकलीबाबतचा तपास सुरू आहे.
ही कारवाई देहूरोड पोलीस स्टेशनच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून, फरार वाहनचोरांवरही लक्ष ठेवण्यात आले आहे. विनानंबर प्लेट, संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






