पुणे: पुण्यातील कोथरूड परिसरातून (Pune Crime) एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मुलीसोबत मैत्री केल्याच्या संशयातून तीन अल्पवयीन मुलांनी आपल्या वयाच्याच एका मुलाची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह नदीत फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे अल्पवयीन मुलांमधील वाढती हिंसा, सोशल मीडियाचा गैरवापर आणि भावनिक असंतुलन यावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. (Latest Marathi News)

पीडित अल्पवयीन मुलगा मंगळवारी घरी परत न आल्याने त्याच्या आईने अलंकार पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तपासादरम्यान महत्त्वाचा धागा कुटुंबालाच मिळाला. हा मुलगा त्याच्या आईच्या मोबाइलवरून सोशल मीडिया अकाऊंट वापरत होता. त्याचा प्रोफाइल तपासला असता एका मुलीकडून आलेला मेसेज दिसून आला आणि त्याच मेसेजनंतर मुलगा गायब झाल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी संबंधित मुलीचा शोध घेतला असता, तिने असा कोणताही मेसेज पाठवलेला नसल्याचे निष्पन्न झाले. यानंतर प्रोफाइल अॅक्टिव्हिटीचा सखोल तपास करण्यात आला. त्यावेळी मुलीचे नाव आणि फोटो वापरून बनवलेले फेक अकाऊंट समोर आले. हे अकाऊंट केवळ मुलाला घराबाहेर बोलावण्यासाठी तयार करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आला.
तांत्रिक तपासात हे फेक प्रोफाइल एका 15 वर्षांच्या मुलाने तयार केल्याचे उघड झाले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने दोन मित्रांच्या मदतीने हत्या केल्याची कबुली दिली. आरोपीच्या म्हणण्यानुसार, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मुलाला भेटीस बोलावण्यात आले. डेक्कन परिसरातील मुठा नदीकाठच्या निर्जन ठिकाणी नेऊन दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली आणि मृतदेह नदीत फेकण्यात आला.
बुधवारी उशिरापर्यंत पुणे पोलीस आणि अग्निशमन दलाने नदीत शोधमोहीम राबवली, मात्र मृतदेह सापडू शकला नाही. आरोपी आणि पीडित दोघेही कोथरूडचे रहिवासी असून आरोपी शाळा सोडलेला असून छोट्या कामांवर उदरनिर्वाह करत होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे यांनी या घटनेची माहिती दिली.







