प्रतिनिधी अमित मुंडीक

Pune Crime : पिंपरी चिंचवड : थेरगाव येथील जगताप नगर परिसरात गैरसमजातून लोखंडी कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 24 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 9.45 वाजता अमित जनरल स्टोअर्सजवळ हा प्रकार घडला. या हल्ल्यात उषा अतुल इंगवले (वय 28) व त्यांची बहीण आशा सोमनाथ बनसोडे या दोघी गंभीर जखमी झाल्या असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश संतोष रणदिवे (रा. जगताप नगर, थेरगाव) याने “तुमच्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला आहे,” असा गैरसमज करून फिर्यादी महिलेशी वाद घातला. वादाचे रूपांतर हिंसाचारात होऊन त्याने हातातील लोखंडी कोयत्याने उषा इंगवले यांच्या डोक्यावर व डाव्या हातावर वार केले. भांडण सोडवण्यासाठी पुढे आलेल्या त्यांच्या बहिणीवरही कोयत्याने हल्ला करून तिला जखमी केले. त्यानंतर आरोपी शिवीगाळ करत पळून गेला.
या प्रकरणी काळेवाडी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(2), 118(1), 352 तसेच आर्म अॅक्ट कलम 4 व 27 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप अटकेत नसून त्याचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मेटे करत आहेत. या घटनेमुळे थेरगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.







