अमित मुंडीक

पिंपरी-चिंचवड: काळेवाडी परिसरात अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत पिंपरी-चिंचवड पोलीस (Pimpri-Chinchwad Police) गुन्हे शाखा युनिट-2 ने तीन तरुणांना अटक केली आहे. 25 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे सुमारे 4.5 वाजता रागा हॉटेलसमोर, हॉटेल पाटीलवाड्याकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर ही धाड टाकण्यात आली.
या कारवाईत आरोपींकडून 13 ग्रॅम गांजा आणि 26.70 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा असा एकूण सुमारे 2 लाख 65 हजार 350 रुपयांचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. प्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रतीक राकेश खेरनार (27, रा. हिंजवडी), मयूर घनश्याम कपाटे ( 25, रा. अशोकनगर, पिंपरी) आणि अक्षय विजय मंथान (28, रा. पिंपरीगाव) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस तपासानुसार, आरोपी क्रमांक 1 कडून 13 ग्रॅम गांजा (किंमत अंदाजे 6,450 रुपये), आरोपी क्रमांक 2 कडून 3.30 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा (किंमत 30,300 रुपये) आणि आरोपी क्रमांक 3 कडून 23.40 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा (किंमत 2,30,400 रुपये) जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस शिपाई रवि प्रकाश पवार यांच्या पथकाने केली. प्राथमिक चौकशीत आरोपींनी हा अमली पदार्थ बेकायदेशीर विक्रीसाठी साठवून ठेवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी पुरवठा साखळीचा तपास सुरू केला असून या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






