अमित मुंडीक

पुणे: वाघोली पोलीस स्टेशन, पुणे शहर हद्दीत बाहेर जिल्ह्यातून ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या एका सराईत व हिस्ट्रीशीटर आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व एक दुचाकी गाडीसह एकूण 2 लाख 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime)
06 डिसेंबर 2025 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास अमृत पॅलेसजवळ, पाटील वस्ती, भावडी रोड, वाघोली येथील सार्वजनिक रस्त्यावरून फिर्यादी यांचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी वाघोली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 708/2025 बी.एन.एस. कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान तपास पथकातील पोलीस अंमलदार अशोक शेळके, गहिनीनाथ बोयणे व साईनाथ रोकडे यांनी वाघोली ते आष्टी (जि. बीड) दरम्यान तब्बल 180 ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपीचा माग काढला. तपासात अंबादास विक्रम मिसाळ (वय 43), रा. पिंपळनेर, ता. शिरूर, जि. बीड हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीकडून चोरीस गेलेला महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर तसेच इतर गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीही शिरूर पोलीस स्टेशन (पुणे ग्रामीण) गु.र.नं. 739/2022 भा.द.वि. कलम 379 अंतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
सदर आरोपीस अटक करण्यात आली असून, एकूण 2,70,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार राम ठोंबरे करत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-7 सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त लोणीकंद विभाग नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन युवराज हांडे यांच्या सूचनेनुसार तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल व पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, ठोंबरे, प्रदीप मोटे, मंगेश जाधव, सुनील कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दीपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण यांनी यशस्वीरीत्या केली आहे.







