Pune Crime: पुणे: पुणे (Pune) शहरातील मांजरी परिसरातून गुन्हे शाखेच्या युनिट 4 च्या पथकाने एका 22 वर्षीय तरुणाला बेकायदेशीर शस्त्र (Illegal weapons) बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. आदित्य अमोल ढसाळ, रा. वेदांत सोसायटी, मांजरी असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा- 31 जानेवारीचा ‘डेडलाईन’ की पुन्हा लांबणीवर? सुप्रीम कोर्टातून ‘मिनी विधानसभा’बाबत मोठी अपडेट समोर!
मिळालेल्या माहितीनुसार, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून शहरात गस्त वाढवण्यात आली असून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी सुरू आहे. याच अनुषंगाने गुन्हे शाखेच्या युनिट 4 चे पथक चंदननगर परिसरात गस्त घालत होते. यावेळी मांजरी परिसरात एका तरुणाकडे बेकायदेशीर शस्त्र असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचला. वेदांत सोसायटी परिसरात संशयित तरुण फिरत असल्याचे दिसताच पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली. त्यानंतर त्याची झडती घेतली असता त्याच्या पँटमध्ये खोचलेले सुमारे 52 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांच्या चौकशीत आदित्य ढसाळ याने पिस्तुल बाळगण्यामागचे कारण सांगितले. त्याची वाद्य विक्रीची दोन दुकाने असून, त्याच्या सोसायटी परिसरात अलीकडे काही लोकांमध्ये वाद झाले होते. भविष्यात कोणाशी भांडण झाल्यास स्वतःचे संरक्षण करता यावे, या भीतीपोटी त्याने हे शस्त्र खरेदी केल्याचे त्याने सांगितले. हे पिस्तुल त्याने रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराकडून घेतल्याची माहितीही समोर आली आहे.
स्वरक्षणाच्या नावाखाली बेकायदेशीर शस्त्र बाळगणे हा गंभीर गुन्हा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे शस्त्र नेमके कोठून आणले गेले आणि यामागे आणखी काही मोठा प्रकार आहे का, याचा अधिक तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.






