पुणे: पुण्यातील पाषाण परिसरात गावठी (Pune Crime) दारूच्या अवैध व्यवसायामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कडक पाऊल उचलले आहे. पाषाण येथील लमाण तांडा परिसरात बेकायदा गावठी दारू तयार करून विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करत त्याला थेट कारागृहात डांबण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संबंधित आरोपीला एक वर्षासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. (Latest Marathi News)

थावरिया वाल्या पातलावत (वय 53, रा. लमाण तांडा, पाषाण) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पातलावत गेल्या अनेक वर्षांपासून पाषाण आणि परिसरात गावठी दारू तयार करून तिची खुलेआम विक्री करत होता. या गावठी दारूच्या सेवनामुळे गंभीर आजार, अंधत्व तसेच जीवितहानीसारख्या घटना घडण्याची शक्यता असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वीही पातलावतविरोधात अनेक वेळा कारवाई केली होती. गावठी दारू विक्रीप्रकरणी त्याच्याविरुद्ध आतापर्यंत 6 गुन्हे दाखल झाले होते. चांगल्या वर्तणुकीसाठी त्याच्याकडून बंधपत्रही घेण्यात आले होते. मात्र, या सर्व कारवायांनंतरही त्याने आपला अवैध व्यवसाय थांबवला नाही. वारंवार कायदा मोडून समाजाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असल्याने अखेर त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात आला. हा प्रस्ताव गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्यामार्फत पोलीस आयुक्तांकडे पाठवण्यात आला. सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पातलावतला नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.







