पुणे: मुंबई आणि पुणे या राज्यातील दोन सर्वात महत्त्वाच्या (Mumbai-Pune Missing link Project) शहरांदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी उभारण्यात आलेला ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आता पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आला आहे. 1 मे, महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता व्यक्त होत असून, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Latest Marathi News)

सुमारे 6,695 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा 13.3 किलोमीटर लांबीचा प्रकल्प खोपोली एक्झिट ते कुसगाव दरम्यान विकसित करण्यात आला आहे. सध्याच्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील धोकादायक वळणं, तीव्र उतार-चढाव आणि पावसाळ्यातील दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असतात. या पार्श्वभूमीवर सुरक्षित आणि सरळ पर्यायी मार्ग उभारण्याची गरज होती. ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प त्याच गरजेचा परिणाम आहे.
या नव्या मार्गामुळे एकूण अंतर सुमारे 6 किलोमीटरने कमी होणार असून प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी घटणार आहे. वाढत्या वाहनसंख्येमुळे आणि नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असलेल्या प्रवाशांसाठी हा बदल महत्त्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे वेळेची बचत झाल्यामुळे इंधन वापरही कमी होणार असून, दररोज सुमारे 1 कोटी रुपयांचे इंधन वाचण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हा प्रकल्प आर्थिक आणि पर्यावरणीय दोन्ही दृष्टीने फायदेशीर ठरतो.
या प्रकल्पातील टायगर व्हॅली परिसरातील केबल-स्टेड पूल हे विशेष आकर्षण आहे. सुमारे 650 मीटर लांबीचा आणि 182 ते 184 मीटर उंचीवर उभारलेला हा पूल अभियांत्रिकी कौशल्याचा उत्कृष्ट नमुना मानला जात आहे. याशिवाय बोगद्यांमध्ये अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, कॅमेरे आणि अग्निशमन सुविधा बसवण्यात आल्या आहेत.
एकूणच, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असून, राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासात ही एक महत्त्वाची झेप मानली जात आहे.







