पुणे: ऐतिहासिक सिंहगड किल्ल्याच्या परिसरात शुक्रवारी दुपारी एका भयंकर अपघाताने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवला. पुण्यातील प्रसिद्ध ‘कात्रज टू सिंहगड’ (K2S) ट्रेकिंग मार्गावर फिरण्यासाठी गेलेले डॉ. प्रशांत नदावते हे बुधलामाची परिसरात पाय घसरून तब्बल 300 ते 350 फूट खोल दरीत कोसळले. निसर्गाचा कोप आणि मृत्यू समोर दिसत असतानाही, डॉक्टरांचे नशीब आणि बचाव पथकाच्या धाडसामुळे हा मृत्यूचा सापळा थोडक्यात चुकला आहे.

डॉ. नदावते सिंहगड परिसरात फिरत होते. घाटातील ‘बुधलामाची’ या निसरड्या आणि अवघड वळणावर त्यांचा पाय अचानक घसरला आणि ते थेट खोल दरीत फेकले गेले. इतक्या उंचावरून कोसळल्यानंतर ते काही काळ बेशुद्ध होते. मात्र, शुद्धीवर आल्यावर त्यांनी दाखवलेले प्रसंगावधान कौतुकास्पद ठरले. जखमी अवस्थेतही त्यांनी खिशातील मोबाईल काढला आणि पोलीस कंट्रोल रूमला फोन करून स्वतःच्या लोकेशनची माहिती दिली. त्यांच्या या एका कॉलने संपूर्ण यंत्रणा कामाला लागली.
पोलीस नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच हवेली पोलीस आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहोचले. तानाजी भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घनदाट झाडी, अंधार आणि उभ्या कड्याचे आव्हान स्वीकारत दरीत उतरण्यास सुरुवात केली. गणेश सपकाळ, संतोष जाधव यांसारख्या सदस्यांनी अडीच तास शर्थीचे प्रयत्न करून डॉक्टरांचा शोध घेतला आणि त्यांना सुखरूप बाहेर काढले. दैव बलवत्तर म्हणून त्यांना केवळ किरकोळ दुखापत झाली आहे.







