पुणे: शहरातील मित्र मंडळ चौक परिसरात काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर काल हल्ला झाल्याची घटना घडली. या प्रकरणी भाजप कार्यकर्त्यांवर मारहाणीचे आरोप करण्यात आले असून, घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. (Hanumant Pawar Congress)

या हल्ल्याविषयी हनुमंत पवार यांनी हल्ला सुनियोजित असल्याचा आरोप केला. सहा जणांनी एकत्र येत आपल्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे त्यांनी म्हटले आहे. “माझ्यावर पिस्तुल रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. शारीरिक मारहाणही करण्यात आली. तरीही संबंधितांना पोलिसांनी सोडून दिले. सरकार नेमके कुणाच्या पाठिशी आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गृहमंत्र्यांच्या अधिपत्याखालील पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोपही त्यांनी केला.
पवार यांनी या घटनेचा निषेध करताना पुण्याच्या राजकीय परंपरेचा उल्लेख केला. “हे शहर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे आहे. येथे द्वेषाचे राजकारण चालणार नाही,” असे ते म्हणाले. पुण्याच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला धक्का देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
तसेच, काँग्रेस भवनावर दगडफेक झाल्याचा दावा करत पवार यांनी सांगितले की, स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार असलेल्या या भवनाला लक्ष्य करण्यात आले. काकासाहेब गाडगीळ, केशवराव जेधे, यशवंतराव चव्हाण, पंडित जवाहरलाल नेहरू आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारख्या नेत्यांच्या कार्याशी संबंधित ठिकाणावर हल्ला झाल्याचे त्यांनी नमूद केले.
“स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होतात, आमच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडली जातात आणि उलट आमच्यावरच गुन्हे दाखल केले जातात. अशा धमक्यांना आम्ही घाबरणार नाही,” असा इशाराही पवार यांनी दिला.






