लोणी काळभोर: “कुणाला आवडो वा न आवडो, पण काळानुसार निर्णय घ्यावे लागतात. लवकरच पुणे परिसरात तीन नवीन महापालिका स्थापन कराव्या लागणार आहेत, अन्यथा अधिकचा विकास निधी मिळणार नाही,” असे स्पष्ट वक्तव्य उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केले. यावेळी त्यांनी विशेषत: लोणी काळभोर, वाघोली, मांजरी, फुरसुंगी, उरुळी देवाची, कदमवाकवस्ती या भागात एक स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करण्याची गरज अधोरेखित केली.

वाढत्या लोकसंख्येचा ताण
सध्या हवेली तालुक्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता ग्रामपंचायतींना करता येत नाही. पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य सेवा, रस्ते, शिक्षण आदी बाबतीत निधीअभावी कामे रखडली आहेत.
अजित पवार यांनी नमूद केले की, महानगरपालिका स्थापन झाल्यास जागतिक बँक आणि केंद्र सरकारच्या निधीचा वापर करता येईल, जो ग्रामपंचायतींना सध्या उपलब्ध होत नाही. त्यामुळे भविष्यातील नागरीकरणाला तोंड देण्यासाठी हे पाऊल अपरिहार्य ठरणार आहे.
चाकणची पाहणी आणि महत्त्वाचा इशारा
अजित पवार यांनी शुक्रवारी चाकण परिसरात वाढलेल्या वाहतूक कोंडीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नजीकच्या काळात येणाऱ्या नागरी विस्ताराचा विचार करता, महानगरपालिकेची आवश्यकता अधिक तीव्र होत असल्याचे स्पष्ट केले.
पूर्वीचा प्रस्ताव आणि तातडीच्या निर्णयाची गरज
शिरूर हवेलीचे तत्कालीन आमदार अशोक पवार यांनी याआधी लोणी काळभोर, उरुळी कांचन आणि कदमवाकवस्ती येथे नगरपरिषद किंवा नगरपालिका स्थापन करण्याची मागणी केली होती. सध्याच्या परिस्थितीत, या भागात बुलेट ट्रेन, लोकल रेल्वे आणि पुरंदर विमानतळ प्रकल्प यामुळे नागरीकरण झपाट्याने वाढणार आहे.
पुणे महानगरपालिका क्षेत्रफळाच्या बाबतीत खुपच मोठी झाली आहे. त्या बरोबरच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या क्षेत्रातील पूर्व हवेलीत सध्या वेगाने नागरीकरण होत आहे. या परिसराला बकाल स्वरूप येण्याअगोदर महानगरपालिका होण्याची गरज आहे. अजित दादांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह व अतिशय योग्य आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर झाली तर या भागाचे विद्रुपीकरण होणार नाही, सुनियोजित, सुंदर शहर वसवता येईल.
-प्रशांत काळभोर (संचालक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती)
महानगरपालिकेचा निर्णय चांगला आहे, परंतु नागरिकांना ग्रामपंचायतीच्या तुलनेत चार पट जास्त कराचा बोजा सोसावा लागणार आहे. मध्यंतरी महानगरपालिकेत घेतलेल्या फुरसुंगी, उरुळी देवाची येथील नागरिकांना अजिबात सोयीसुविधा मिळाल्या नाहीत. ड्रेनेज लाईन, रस्ते, पिण्याचे पाणी अशा मुलभूत गरजाही महापालिका तेथील नागरिकांना पुरवू शकली नाही. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व महानगरपालिका या तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्था नागरिकांना सोयीसुविधा पुरवतात. परंतु, महानगरपालिकेमुळे अतिरिक्त कर भरावा लागतो. नागरिक तिन्ही ठिकाणी मतदान करतात. महानगरपालिकेमुळे लोकांच्या जगण्यात विशेष फरक पडणार नाही.
-सनी उर्फ युगंधर काळभोर (माजी उपसभापती, हवेली पंचायत समिती)







