पुणे: पुणेकरांसाठी प्रवास अधिक सोपा आणि परवडणारा होण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले जात असून देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा ‘भारत टॅक्सी’ (Bharat Taxi) लवकरच शहरात सुरू होणार आहे. पुणे आरटीओच्या माहितीनुसार, मे महिन्यापर्यंत ही सेवा सुरू करण्याचे नियोजन असून, यामुळे ओला-उबरसारख्या अॅप-आधारित सेवांना पर्याय उपलब्ध होणार आहे. (Latest Marathi News)

गेल्या काही वर्षांत पुण्यात रिक्षा आणि कॅब चालकांकडून मीटरपेक्षा जास्त भाडे आकारणे, सर्ज प्राईझिंगमुळे अचानक दरवाढ होणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सहकारी तत्वावर आधारित ‘भारत टॅक्सी’ सेवा महत्त्वाची ठरत आहे. या मॉडेलमध्ये चालकच मालक असतील आणि कमाईतून सुमारे 80 टक्के हिस्सा थेट चालकांना मिळणार आहे. त्यामुळे मध्यस्थांचा हस्तक्षेप कमी होऊन प्रवाशांना कमी दरात सेवा मिळण्याची अपेक्षा आहे.
सध्या गुजरात आणि दिल्लीमध्ये ही सेवा सुरू असून तेथील अनुभव पाहता भाडे ओला-उबरच्या तुलनेत सुमारे 30 टक्क्यांनी कमी असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे या सेवेत सर्ज प्राईझिंग नसणार असल्याने गर्दीच्या वेळेतही भाडे अचानक वाढणार नाही. त्यामुळे प्रवाशांना निश्चित आणि पारदर्शक दरात प्रवास करता येईल.
या सेवेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे चालकांसाठी असलेली लवचिकता. ओला, उबर किंवा इतर अॅप्ससोबत काम करणारे चालकही या प्लॅटफॉर्मवर येऊ शकतात. त्यांच्यावर कोणतीही बंधने नसतील. सध्या आरटीओ आणि टॅक्सी चालकांमध्ये भाडे आणि अटींबाबत चर्चा सुरू असून अंतिम निर्णय चालकांच्या सहमतीने घेतला जाणार आहे.
एकूणच, वाढत्या महागाईच्या काळात पुणेकरांसाठी स्वस्त, पारदर्शक आणि विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने ‘भारत टॅक्सी’कडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे.







