पुणे: पुणेकरांसाठी पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने दिलासादायक (Mulashi Dam Water Supply) ठरणारी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. झपाट्याने वाढणारे नागरीकरण, वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारी पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता, मुळशी धरणातून पुणे शहराला 7 टीएमसी पाणी देण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकार आणि टाटा कंपनीने तत्त्वतः मान्यता दिली आहे. यामुळे भविष्यात शहराच्या पाणीपुरवठ्यावरील ताण कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

सध्या पुण्याचा मुख्य पाणीपुरवठा खडकवासला धरण साखळीवर अवलंबून आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांमधून शहराला पाणी मिळते. मात्र शहराचा वेगाने होत असलेला विस्तार आणि वाढती मागणी यामुळे या धरणांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. उन्हाळ्यात पाणीकपातीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता कायम असते. याच पार्श्वभूमीवर पर्यायी स्रोतांचा शोध सुरू होता.
मुळशी धरणातील पाणी प्रामुख्याने टाटा हायड्रो पॉवर कंपनीच्या वीजनिर्मितीसाठी वापरले जाते. मात्र या प्रक्रियेनंतर काही पाणी पश्चिमेकडे समुद्रात वाहून जाते. हेच अतिरिक्त पाणी पुण्यासाठी वळवण्याचा पर्याय पुढे आला आणि त्यावर राज्य सरकार व टाटा कंपनीमध्ये सकारात्मक चर्चा झाली. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला हिरवा कंदील देण्यात आला.
या प्रकल्पासाठी तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करण्यासाठी विशेष तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. पाणी कोणत्या मार्गाने आणि कोणत्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुण्यात आणता येईल, याचा अभ्यास सुरू आहे. बोगदा किंवा स्वतंत्र वाहिनीमार्फत पाणी वळवण्याचे पर्याय विचाराधीन आहेत.
या प्रकल्पाची अंमलबजावणी झाल्यास पुण्याच्या पाणीपुरवठ्याला मोठा आधार मिळणार आहे. खडकवासला धरण साखळीवरील अवलंबित्व कमी होऊन दीर्घकालीन जलव्यवस्थापन अधिक सक्षम होईल. वाढत्या शहरासाठी टिकाऊ पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.







