पुणे, ता. 29: पुण्यात घुसखोरी करून बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करण्यासाठी आलेल्या 7 बांगलादेशी घुसखोरांना पुणे शहर पोलिसांनी सन 2023 मध्ये अटक केली होती. या गुन्ह्यातील सर्व आरोपींना न्यायालयाने दोन वर्ष दोन महिने साधी कैद व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हे आदेश पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यू.पी. कुलकर्णी यांनी शनिवारी (ता.29) दिले आहेत. (pune crime news)

जुलिया जोसिम शेख (वय-25), सोनिया मोटासीन शेख (वय-27), जस्मिन नुडीस्माल मंडोल (वय-27), रीमा मुजावर मंडोल (वय-28), कविता मिजानूर शेख (वय-35), सीमा अफसर शेख (वय-26) व मेघना गोपाल बिश्वास (वय-23, सर्व रा. बांगलादेश) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशातुन कोणत्याही वैध कागदपत्राशिवाय तसेच भारत बांगलादेश सिमेवरील मुलकी अधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय रात्रीच्यावेळी लपत छपत वरील सातही महिलांनी घुसखोरी करून भारतात प्रवेश केला होता. त्यानंतर सर्व महिला पुण्यातील बुधवार पेठेत अनाधिकृतपणे वास्तव्य करून वेश्या व्यवसाय करीत असल्याचे पोलिसांना आढळुन आले.
त्यांच्यावर पारपत्र अधिनियम 1950 कलम 3 सह 6, परकीय नागरीक आदेश 1948 चा नियम 3 (1) सह परकीय नागरीक कायदा 1946 चे कलम 14 अ (अ.ब) प्रमाणे फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच, फरासखाना पोलिसांनी तत्काळ सर्व आरोपी महिलांना अटक केली होती. या गुन्ह्याचा खटला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने वकील प्रमोद हजारे यांनी कामकाज पहिले. या खटल्यात प्रमोद हजारे यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना दोन वर्ष साधी कैद व पाचशे रुपये दंड न भरल्यास दहा दिवस साधी कैद व परकीय कायदा कलम 14 (A)(a)(b)अन्वये दोन वर्ष दोन महिने साधी कैद व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
दरम्यान, या खटल्यात सरकारी वकील प्रमोद हजारे यांना फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम नामवाडे, पोलीस उपनिरीक्षक जयसिंग दाडे, सहाय्यक पोलीस फौजदार ज्ञानोबा महानवर, शिरीष कुमार शिंदे, संतोष शिंदे, पोलिस हवालदार नितीन दुधाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी बहुमुल्य मदत केली आहे.







