पुणे: कल्याणीनगर अपघात प्रकरणातील महत्त्वपूर्ण पुरावे नष्ट करण्याच्या कटात ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे सहभागी असल्याचे गंभीर आरोप सरकार पक्षाने केले आहेत. डॉ. तावरे यांनी स्वतःच्या निर्दोष मुक्ततेसाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला असून, त्यावर १० जून रोजी सुनावणी होणार आहे.

सत्र न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांच्या न्यायालयात ही सुनावणी सुरू असून, विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी तावरे यांच्या अर्जाला जोरदार विरोध केला. त्यांनी न्यायालयात दिलेल्या युक्तिवादात म्हटले की, “कल्याणीनगर अपघातानंतर अल्पवयीन आरोपीचा रक्तनमुना बदलण्यासाठी मोठा कट रचण्यात आला. या कटात डॉ. अजय तावरे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. त्यांनी ससून रुग्णालयातील आपत्कालीन विभागाचे तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांच्याशी संपर्क साधला होता.”
ही माहिती पोलिसांकडून तांत्रिक तपासाच्या आधारे उघड झाली आहे. डॉ. तावरे यांनी अपघाताच्या दिवशी आपण रजेवर होतो असा दावा न्यायालयात केला असला, तरी मोबाईल कॉल डिटेल्सच्या तपासणीत त्यांचा हाळनोर आणि घटकांबळे यांच्याशी नियमित संपर्क असल्याचे समोर आले आहे.
विशेष सरकारी वकिलांनी पुढे सांगितले की, “या प्रकरणातील साक्षीदारांनी आपला जबाब नोंदवला असून, पालकांच्या दबावाखाली तावरे यांनी रक्तनमुने बदलण्यासाठी सहकार्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील आरोपींनी संगनमत करून लाच दिली होती, आणि त्या बदल्यात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला.”
कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मोटारचालक व त्याचे मित्र यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्यांचे रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात तपासण्यासाठी पाठवण्यात आले होते. मात्र, या नमुन्यांमध्ये फेरफार करण्यात आली. पोलिसांच्या तपासात असे निष्पन्न झाले आहे की, विशाल अगरवाल, त्याची पत्नी शिवानी, अरुणकुमार सिंग यांनी अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, आदित्य सूद, आणि आशिष मित्तल यांच्यासह संगनमत करून नमुने बदलण्यासाठी कट रचला होता.
या संपूर्ण प्रकरणात भारतीय दंड संहिता, मोटार वाहन कायदा आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात आरोपींविरोधात आरोपपत्रही सादर करण्यात आले आहे. आता १० जून रोजी डॉ. तावरे यांच्या अर्जावर न्यायालयात पुढील सुनावणी होणार असून, त्यांचे वकील त्यांची बाजू मांडणार आहेत. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.







