Politics : पुण्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडींना वेग आला असून, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत तणाव शिगेला पोहोचल्याचं चित्र आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (politics)

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ युतीचा प्रस्ताव घेऊन अजित पवार यांच्या भेटीला गेलं आहे. धंगेकर यांनी अजित पवारांसमोर २५ ते ३० जागांचा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या भेटीआधी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून संवाद झाल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुण्यात महायुती तुटण्याच्या उंबरठ्यावर असल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात महापालिका निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपावर बैठकींचं सत्र सुरू आहे. मात्र भाजप आणि शिवसेना यांच्यात अद्याप एकमत झालेलं नाही. सुरुवातीला भाजपकडून शिवसेनेला केवळ १२ जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. हा प्रस्ताव शिवसेनेला मान्य नसल्याने पक्षात तीव्र नाराजी पसरली. (political news)
या नाराजीचा उद्रेक कार्यकर्त्यांच्या आंदोलनातूनही दिसून आला. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. नीलम गोऱ्हे यांनीही थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जागावाटपात सन्मानजनक वाटा मिळत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून भाजपकडे ६० जागांची मागणी करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं.
पुण्यातील महायुतीतील हा तिढा सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती. उदय सामंत यांनी पुण्यात येऊन भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या, मात्र तरीही दोन्ही पक्षांमध्ये सहमती होऊ शकलेली नाही. भाजप-शिवसेना युतीचं जागावाटप अंतिम टप्प्यापर्यंत ठरत नसल्याने शिवसेनेने पर्यायी मार्गाचा विचार सुरू केल्याचं दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीची चाचपणी करत असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील शिवसेनेचे बडे नेते रवींद्र धंगेकर यांची अजित पवारांशी भेट आणि त्याआधी एकनाथ शिंदे यांनी केलेला फोन संवाद, या घडामोडींमुळे राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जर पुण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात जागावाटप निश्चित झालं, तर महायुतीला मोठा धक्का बसणार असून, पुण्यात महायुती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता अजित पवार या प्रस्तावावर काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.







