पिंपरी-चिंचवड : गणेशोत्सव आणि अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १४ दिवसांसाठी मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१च्या कलम ३७(१)(३)नुसार हा आदेश १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून २९ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.

या कालावधीत विविध सण, उत्सव, जयंती आणि पुण्यतिथी तसेच २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विविध मागण्यांसाठी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून मोर्चे, धरणे, निदर्शने, उपोषणे किंवा बंद पुकारले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

मनाई आदेशाच्या काळात दाहक किंवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव, दगड, काचेचे तुकडे, रिकाम्या काचेच्या बाटल्या तसेच शस्त्रे आणि इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू बाळगण्यास किंवा जमा करण्यास बंदी असेल. चाकू, सुरा, कोयता, तलवार, भाला, काठी, बंदूक यांसारखी हत्यारे सोबत ठेवण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्तांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करणे, सभा घेणे अथवा मिरवणूक काढण्यास बंदी राहणार आहे. तसेच आक्षेपार्ह घोषणा, सभ्यता व नीतिमत्तेला बाधा आणणारी भाषणे किंवा कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या कृती करण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे.
शासकीय सेवेत असलेल्या आणि कर्तव्य बजावताना हत्यार बाळगणे आवश्यक असलेल्या व्यक्तींना या आदेशातून वगळण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१च्या कलम १३५नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.






