Pune Suicide News : पुणे : पुणे (Pune) जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine’s Day) दिवशी एक अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आकुर्डी परिसरातील गुरुद्वारा कॉलनीमध्ये एका 23 वर्षीय तरुणानं आपल्या राहत्या खोलीत गळफास लावून टोकाचं पाऊल उचललं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Suicide News)

मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ संजय माळी असं या मृत तरुणाचं नाव असून तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी होता. तो आकुर्डी परिसरात आपल्या काही मित्रांसोबत भाड्याने खोली घेऊन राहत होता. शनिवारी दुपारी समर्थचे सर्व मित्र जेवणासाठी बाहेर गेले होते आणि तो खोलीवर एकटाच होता. काही वेळाने मित्र जेव्हा खोलीवर परतले, तेव्हा त्यांना दरवाजा आतून बंद असल्याचं दिसलं. वारंवार आवाज देऊनही आतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मित्रांना संशय आला. त्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता समर्थ गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
या घटनेची माहिती तातडीने चिंचवड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात पाठवला. प्राथमिक तपासात आणि मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमसंबंधातून आलेल्या नैराश्यामुळे समर्थने हे पाऊल उचललं असावं अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र, त्याच्या खोलीत कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्यामुळे आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
समर्थच्या निधनाची बातमी त्याच्या सोलापूरमधील कुटुंबीयांना देण्यात आली आहे. चिंचवड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून समर्थच्या मोबाईल फोनचे रेकॉर्ड्स आणि त्याच्या मित्रांची चौकशी केली जात आहे.






