पिंपरी-चिंचवड: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आजची सकाळ वाहतूक कोंडीत गेली. पिंपरी महापालिका भवनासमोर असलेल्या मोरवाडी चौकातील ग्रेड सेपरेटरमध्ये एक अवजड कंटेनर अडकल्याने या मार्गावरील वाहतुकीचा अक्षरशः खोळंबा झाला. तासन् तास चाललेल्या या गोंधळामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे आणि प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

वर्दळीच्या वेळी कंटेनर मोरवाडी चौकातील ग्रेड सेपरेटरमध्ये शिरला. वास्तविक, या बोगद्याची उंची मर्यादित असून तेथे अवजड वाहनांना बंदी असल्याचे फलक स्पष्टपणे लावलेले आहेत. मात्र, उंचीचा अंदाज न आल्याने किंवा नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा कंटेनर मध्यभागीच अडकला. कंटेनरची उंची बोगद्यापेक्षा जास्त असल्याने तो पुढेही जाईना आणि मागेही येईना, अशी स्थिती निर्माण झाली.
खेर अग्निशमन दल आणि पोलिसांनी कंटेनरच्या चाकांमधील हवा काढून त्याची उंची कमी करण्याचा प्रयत्न केला आणि क्रेनच्या मदतीने हा अडथळा दूर केला. सध्या वाहतूक संथ गतीने सुरू आहे.






