Pune Cyber Crime : पिंपरी-चिंचवड : शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणुकीच्या नावाखाली सायबर (Cyber Crime) गुन्हेगारांकडून फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. अशाच एका प्रकरणात पिंपरी-चिंचवडमधील एका मोठ्या उद्योजकाची तब्बल 11 कोटी 13 लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बनावट कागदपत्रे आणि खोटे आश्वासन देत एका महिलेने आणि तिच्या साथीदारांनी ही फसवणूक केली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, हे या वर्षातील सर्वात मोठ्या सायबर फसवणुकींपैकी एक मानले जात आहे.

माहितीनुसार, नैना वर्मा आणि गोपाल कावेलीरेड्डी नावाच्या संशयितांनी व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून उद्योजकाशी संपर्क साधला. त्यांनी आपली कंपनी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) मध्ये नोंदणीकृत असल्याचे भासवले. यासाठी त्यांनी बनावट प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर जास्त नफा मिळेल असे सांगून त्यांनी एका बनावट अॅप आणि लिंकद्वारे गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.
4 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत उद्योजकाकडून टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम घेतली गेली. सुरुवातीला अॅपवर नफा दिसत असल्याने उद्योजकाचा विश्वास वाढला. मात्र, जेव्हा पैसे परत काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संशयितांनी विविध कारणे सांगून टाळाटाळ केली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर उद्योजकाने तात्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या प्रकरणी नैना वर्मा, गोपाल कावेलीरेड्डी आणि संबंधित व्हॉट्सॲप ग्रुप चालवणारे तसेच बँक खातेदारांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आरोपींनी जमा झालेली रक्कम इतर खात्यांमध्ये वळवली असल्याची माहिती समोर आली आहे.






